SpaceX IPO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनी स्पेस एक्स आता जागतिक बाजारात नवे विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या अहवालानुसार, स्पेस एक्स एक मोठ्या ‘टेंडर ऑफर’ची योजना आखत आहे. जर हा व्यवहार यशस्वी झाला, तर कंपनीचे मूल्यांकन ८०० अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास ७१,९६,६८० कोटींपर्यंत पोहोचू शकते.
ओपन एआयचा विक्रम मोडणार
या टेंडर ऑफर अंतर्गत SpaceX इनसाइडर शेअर्स (कंपनीतील अंतर्गत लोकांचे शेअर्स) विकण्याच्या तयारीत आहे. या मोठ्या व्यवहारामुळे कंपनीचे मूल्यांकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओपन एआय (ChatGPT बनवणारी कंपनी) पेक्षाही खूप पुढे जाईल. ओपन एआयने ऑक्टोबर महिन्यात ५०० अब्ज डॉलरचा विक्रम केला होता. मात्र, मस्क यांची स्पेस एक्स आता ८०० अब्ज डॉलरचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, स्पेस एक्सच्या शेअर्सची किंमत ४०० डॉलर प्रति शेअर किंवा त्याहून अधिक असू शकते. जरी हा व्यवहार ३०० डॉलर प्रति शेअर दराने निश्चित झाला, तरीही कंपनीचे मूल्य ५६० अब्ज डॉलर इतके प्रचंड असेल.
आयपीओ कधी येणार?
या टेंडर ऑफरमुळे २०२६ च्या सुरुवातीला येणाऱ्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा मार्ग सुकर होऊ शकतो. याचाच अर्थ, पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला स्पेस एक्स शेअर बाजारात अधिकृतपणे लिस्टेड होऊ शकते.
कंपनीच्या संचालक मंडळाने टेक्सास येथील स्टारबेस हबमध्ये या महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा केली आहे. अंतिम करार कोणत्या किमतीला होईल हे निश्चित नसले तरी, कंपनी सार्वजनिक होण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इकोस्टारच्या शेअर्समध्ये १८% उसळी
या मोठ्या बातमीचा परिणाम केवळ मस्क यांच्या कंपनीपुरता मर्यादित नाही, तर स्पेस एक्सशी जोडलेल्या इतर कंपन्यांवरही दिसून आला आहे. स्पेस एक्सचे मूल्यांकन वाढण्याच्या बातमीमुळे सॅटेलाइट टीव्ही आणि वायरलेस कंपनी इकोस्टार कॉर्पच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली.
वाचा - इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
या वाढीमागील कारण म्हणजे दोन्ही कंपन्यांमध्ये झालेला नुकताच करार. गेल्या महिन्यात इकोस्टारने स्पेस एक्सला २.६ अब्ज डॉलरमध्ये स्पेक्ट्रम परवाना विकण्यास सहमती दर्शवली होती, ज्यामुळे मस्क यांच्या कंपनीला त्यांच्या वायरलेस सेवा अधिक मजबूत करण्यात मदत होणार आहे.
